Stock Market : गेल्या वर्षभरापासून अस्थिर असलेल्या शेअर बाजारात या आठवड्यात चांगली वाढ पाहायला मिळाली. संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह संचारलेला असताना, त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आहे. दिवाळीपूर्व आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी अनुभवायला मिळाली. या तेजीमुळे देशातील अव्वल १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
आकडेवारीनुसार, या एका आठवड्यात टॉप १० मधील ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण २,१६,५४४.२९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे ३ कंपन्यांच्या बाजार मूल्याला ६१,७९८.२३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, देशातील आयटी कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे.
बाजाराला IPO चा आणि FII चा आधार
बाजारातील या वाढीला देशात आलेल्या दोन मोठ्या आयपीओला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या खरेदीमुळे मोठा आधार मिळाला आहे. आठवड्याभरात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १.७५ टक्क्यांनी तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी सुमारे २ टक्क्यांनी वधारला.
या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ
कंपनीचे नाव | मार्केट कॅपमधील वाढ (कोटी रुपये) | आठवड्यानंतरचे मार्केट कॅप (कोटी रुपये) |
रिलायन्स इंडस्ट्रीज | ४७,३६३.६५ | १९,१७,४८३.७१ |
भारती एअरटेल | ४१,२५४.७३ | ११,४७,२३५.०८ |
आयसीआयसीआय बँक | ४०,१२३.८८ | १०,२६,४९१.३५ |
एचडीएफसी बँक | ३३,१८५.५९ | १५,४०,२१०.७८ |
बजाज फायनान्स | २८,९०३.४५ | ६,६५,८९९.१९ |
हिंदुस्थान युनिलिव्हर | १७,७७४.६५ | ६,१२,००९.७८ |
भारतीय स्टेट बँक | ७,९३८.३४ | ८,२०,९२४.९८ |
रिलायन्स इंडस्ट्रीजने या आठवड्यात सर्वाधिक फायदा मिळवत आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
या कंपन्यांना झाला तोटा
बाजारात तेजी असूनही देशातील तीन मोठ्या कंपन्यांच्या बाजार मूल्यात घट झाली आहे.
- इन्फोसिस : कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ३०,३०६.३५ कोटी रुपयांची मोठी घट झाली. (नवीन M-Cap: ५,९८,७७३.८७ कोटी)
- टीसीएस : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला २३,८०७.०१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. (नवीन M-Cap: १०,७१,८९४.६१ कोटी)
- एलआयसी : सरकारी विमा कंपनी एलआयसीचे मूल्यांकन ७,६८४.८७ कोटी रुपयांनी घटले. (नवीन M-Cap: ₹५,६०,१७३.४२ कोटी)
- आयटी कंपन्यांच्या तिमाही निकालांनंतर त्यांच्या महसुलाच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी निराशा दिसून आली, त्यामुळे या क्षेत्रात विक्रीचा दबाव वाढला.
वाचा - सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
- रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम असून, त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, एचयूएल, इन्फोसिस आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.